सभागृहात शिंदे गट आक्रमक प्रत्युत्तर देणार ; मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी करताना तिखट हल्ला शिंदे गटातील आमदारांवर चढवल्याने बंडखोर गट गांगरून गेला.
पण नंतर शिंदे गटाची बैठक होऊन त्यात विरोधकांना जशास तसे आक्रमक उत्तर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू झाले.
पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या विरोधी पक्षांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यातही शिंदे गटातील आमदारांविरोधात आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली होती. शिंदे गटातील मंत्री, आमदार विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांजवळ आल्यावर”५० खोके, एकदम ओके, आले आले गद्दार आले’ अशा घोषणांनी त्यांना हिणवण्यात आले. वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांमधून राज्यभर हे चित्र गेल्याने शिंदे गटातील आमदार व नेते अस्वस्थ झाले. विरोधक असे वरचढ झाले तर राजकीय कोंडी होणार हे लक्षात घेऊन शिंदे गटाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती.
या बैठकीत विरोधकांची घोषणाबाजी, अधिवेशनात येणारे विषय व त्यावर विरोधकांचा संभाव्य पवित्रा यांची चर्चा करून सभागृहात आणि सभागृहाबाहेर माध्यमांसमोर विरोधकांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचा सर्वाचा सूर होता. त्यानुसार विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मारहाण प्रकरणात टीकेचे लक्ष्य केलेले आमदार संतोष बांगर यांनाही जरा सुबरीने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समजते.
सेनेच्या आमदारांची आसनव्यवस्था आमने-सामने
मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आणि त्यांच्यात सहभागी न झालेले शिवसेनेचे १५ आमदार हे दोघेही आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. विधानसभाध्यक्षांनी शिंदे गटाच्या नेत्यांना शिवसेना गट नेता व मुख्य प्रतोद अशी मान्यता दिली आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेच्या आमदारांना विधानसभेत वेगळी मान्यता नाही. तरीही या दोन्ही गटांची आसनव्यवस्था आमने-सामने होती. विधानसभाध्यक्षांनी नेमून दिल्याप्रमाणे शिवसेना आमदार आसनांवर बसल्याचे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….