हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पुन्हा “घरवापसी” ; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आज पुन्हा शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
हिंगोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने बहुतांश वेळा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सुभाष वानखेडे यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधल्याने हिंगोलीतील बंडखोराचे धाबे दणाणले आहेत. वानखेडे हे हदगाव मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार होते आणि एक वेळ हिंगोलीचे खासदार होते. ‘छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनायक भिसे यांनीही वानखेडे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केल्याने हिंगोलीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. येत्या काळात आणखी काही नेते शिवसेनेत येणार असल्याचीही चर्चा आहे.