राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण, शरद पवारांचा CM, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फोन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांना आधी फोन करून आणि नंतर पत्र पाठवून गोविंद बागेत जेवायला बोलावलं आहे.
शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी येऊन जेवणाचा आग्रह केला आहे.
बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत. 2 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे, त्यानिमित्ताने अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. राज्य सरकारकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन मार्चला सकाळी 10 वाजता या मेळाव्याची सुरूवात होणार आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या या निमंत्रणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि फोनही केला. अतिथी देवो भव, बारामतीमध्ये आमच्या बारामतीमध्ये आल्यावर आम्हाला खूप आनंद वाटेल, जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात तर. जेवणाचा मेन्यू मी ठरवत नाही, प्रतिभा पवार ठरवतात’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.