‘देवेंद्रजी हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चॅलेंज…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईमध्ये पार पडलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला. कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा काढला, तुमचं मत काय? देवेंद्रजींची परिस्थिती हलाखीची आहे.
तुम्ही जाहिरात द्यायची, सहन होत नाही सांगताही येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करतेच. ज्यांच्या स्वातंत्र्य संग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एक विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छितात, त्याच्याबद्दल तुमचं मत काय?
सावरकरांनी हाल अपेष्टा भोगल्या त्या मोदी-फडणवीस यांच्यासाठी भोगल्या का? खरे सावरकर प्रेमी असाल तर देशाला बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्याचा धिक्कार करा. हिंमत असेल तर करून दाखवा,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलं आहे. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिरातींवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाले, त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली. मध्ये जाहीरात आली त्यात बापच बदलला होता. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे फोटो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.