उपराष्ट्रपती पद निवडणूकीआधीच विरोधकांमध्ये फूट ; मतदान न करण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांचा विजय झाला आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर आता सगळ्यांच लक्ष उपराष्ट्रपती निवडणुकीकडे लागलं आहे.
भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनकड यांना उपराष्ट्रपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीअगोदरच विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा सुरु आहेत.
ममता बॅनर्जी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करणार नाहीत
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे जाहीर केले आहे. उमेदवार निवडताना आम्हाला विश्वास घेतला नसल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. मात्र, ममता यांच्या या निर्णयाचा एनडीएलाच फायदा होईल अशा चर्चा सुरु आहेत.
६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
येत्या ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. जयदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा यांच्यामध्ये ही लढत होईल. एनडीएचे उमेदवार जयदीप धनकड हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र, निवडणुकीअगोदरच विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याने अल्वा यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत १७ खासदारांची मतं फुटली
राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.