NEET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेले ११ पैकी ७ जण महाराष्ट्रातील ; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनीच ती कशी फोडली..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सखोल चौकशी केली जात आहे. राजस्थानच्या सिकर शहरातून हे प्रकरण पहिल्यांदा समोर आले.
त्यानंतर याची व्याप्ती देशभरात पसरली. मात्र पेपरफुटीचे केंद्रस्थान महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती दिसत आहे. सीबीआयने शुक्रवारी पुण्यातून आणखी एका शिक्षिकेची अटक केली. यामुळे एकूण अटक केलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली असून त्यातील ७ जण महाराष्ट्रातील आहेत. तसेच यापूर्वी अटक केलेल्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांच्या चौकशीतून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. लेखाच्या शेवटी अटक झालेल्यांची संपूर्ण यादी पाहा.
मांढरे यांनी त्यांच्या विषयाशी निगडित प्रश्नपत्रिका तयार केली. त्याशिवाय वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयाच्या प्रश्नांचे अनुवादनही केले होते. पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात २४ वर्ष जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या मनीषा मांढरे यांना मागच्याच आठवड्यात अटक करण्यात आली होती. जीवशास्त्राचे प्रश्न तयार करण्याखेरीज मांढरे यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांच्या प्रश्नांचीही माहिती होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका फोडण्यात त्यांच्या सहभागाची व्याप्ती वाढल्याचे समोर आले आहे.
तसेच लातूरमधील दयानंद ज्युनियर कॉलेजचे रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनाही पेपरफुटी प्रकरणात अटक झालेली आहे. त्यांचाही प्रश्नपत्रिकेचे मराठी भाषांतर करण्यात सहभाग होता, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
मनीषा मांढरे यांनी सहआरोपी मनीषा वाघमारे आणि कुलकर्णी यांच्यासह मिळून कट रचल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सूत्रांच्या माहितीने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल २०२६ मध्ये, मांढरे यांनी मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एकत्र केले. पुण्यातील स्वतःच्या निवासस्थानी त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग घेतले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, एनटीएने निवडक प्रश्नांचे अनुवादन करण्यास सांगितल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका मिळाली.
मांढरे यांनी आर्थिक लाभाच्या मोबदल्यात निवडक विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधित प्रश्न पुरवले. सीबीआयने त्यांना पुन्हा पुण्यात नेऊन ज्या ज्या ठिकाणी शिकवणी वर्ग घेतले याची माहिती घेतली गेली. तसेच वाघमारे आणि विद्यार्थ्यांची भेट कुठे झाली, याचीही माहिती सीबीआयकडून गोळा केली जात आहे.
इंग्रजी भाषेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना १२ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्नपत्रिका सोडवण्याची मुभा दिली जाते. सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १२ भाषांसाठी प्रत्येकी दोन अनुवादकांची नेमणूक केली होती. प्रश्नसंच तयार करणाऱ्यांचाही अनुवादनाच्या कामात सहभाग असतो, जेणेकरून प्रश्नपत्रिका कमीत कमी लोकांमध्ये हाताळता येईल, हा यामागचा हेतू.
नीटची प्रश्नपत्रिका कशी तयार होते?
सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यापूर्वी एनटीएने केलेल्या चौकशीत असे आढळले की, नीट-यूजी प्रश्नपत्रिकेतील रसायनशास्त्राचे सर्व प्रश्न आणि जीवशास्त्र विभागातील काही प्रश्न एका अंदाजित प्रश्नपत्रिकेशी जुळत होते. नीटच्या प्रश्नपत्रिकेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचे एकूण १८० प्रश्न असतात.
विषयाचे तज्ज्ञ प्रश्नपत्रिकेसाठी प्रश्न सुचवतात. त्यानंतर ते प्रश्न एकत्र करून तज्ज्ञांच्या पथकाद्वारे प्रश्नपत्रिका तयार केली जाते. प्रश्नपत्रिका छपाईसाठी पाठवण्यापूर्वी त्या सोडवल्या जातात, त्याचे अनुवादन केले जाते.
किती जणांना अटक?
सीबीआयने शुक्रवारी नीट पेपरफुटी प्रकरणात अकरावी अटक केली. त्यांच्यावर भौतिकशास्त्राचे प्रश्न फोडल्याचा आरोप आहे. मनीषा हवालदार या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत भौतिकशास्त्राच्या शिक्षिका आहेत. हवालदार या ‘नीट २०२६’ या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्थेत (एनटीए) त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती.
महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश
या प्रकरणात विविध शहरांत कारवाई करताना ११ जणांची अटक झाली. त्यापैकी ७ जण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यांची नावे आणि पार्श्वभूमी खालीलप्रमाणे…
पी. व्ही. कुलकर्णी (पुणे/मूळचे लातूर): हे निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक असून या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मानले जातात. ते एनटीएच्या तज्ज्ञ पॅनेलवर असल्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिका हाताळता आली.
मनीषा गुरुनाथ मांढरे (पुणे): या वरिष्ठ जीवशास्त्राच्या शिक्षिका आहेत.
मनीषा संजय हवालदार (पुणे): पुण्यातील शिक्षिका असलेल्या हवालदार यांनी भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका फोडून ती सह-आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
शिवराज रघुनाथ मोटेगावकर (लातूर): लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’चे संस्थापक असलेल्या मोटेगावकर यांनाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले आहे.
मनीषा वाघमारे (पुणे): पुण्यातील ब्युटी पार्लर चालिका वाघमारेने प्रश्नपत्रिका खरेदी करण्यासाठी तयार असणारे विद्यार्थी आणि पैसेवाले पालक शोधण्याचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये गोळा करण्याचे काम केले.
डॉ. धनंजय लोखंडे (अहिल्यानगर): हे या रॅकेटमध्ये मुख्य मध्यस्थ म्हणून काम करत होते. त्यांनी राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रातील आरोपींमध्ये संपर्क घडवून आणण्याचे काम केले.
शुभम खैरनार (नाशिक): नाशिकमधील BAMS चा विद्यार्थी. याने १० लाख रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेतली. ती स्कॅन करून पुढे हरियाणा आणि राजस्थानमधील एजंट्सना १५ लाखांना विकली.

उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा; गडकरींचा मोठा दावा- वाहने आता फक्त २५ रुपये दराच्या इंधनावर चालतील…
‘..तर उद्या सकाळी जीवन संपवतो’; मनोज जरांगेंच्या विधानाने राज्यात खळबळ…
‘त्या’ वक्तव्यानंतर NCP नेते नाराज, तरीही शिरसाट बोलतच राहिले, अखेर शिंदेंनी केली कानउघडणी…
आता शत्रू टप्प्यातच. 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल, 1000 किमीपर्यंत जाणारे ड्रोन. शिर्डीत दुश्मनांना धडकी भरणाऱ्या शक्तीचा प्रयोग….
चीनच्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, स्फोटामध्ये 90 कामगारांचा मृ्त्यू…
NEET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेले ११ पैकी ७ जण महाराष्ट्रातील ; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनीच ती कशी फोडली..?