कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट हॅक; बेरोजगारीवरून टीका होत असताना भाजपाकडून रोजगार मेळावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “देशात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून काँग्रेसने आज (२३ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम पेज हॅक झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये एजेयूपी पक्षाचे अध्यक्ष हुमायून कबीर यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारला “आगीशी खेळू नका” असा इशारा दिला आहे. रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वाटप पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. ५ महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून काँग्रेसचे पंतप्रधानांना चार प्रश्न
देशात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून काँग्रेसने आज (२३ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. महागाईपासून नागरिकांचे रक्षण करण्यात केंद्र सरकार अपयशी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच ऊर्जा धोरण आणि परराष्ट्र धोरणावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. वरिष्ठ काँग्रेस नेते राजीव गौडा यांनी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार प्रश्न विचारले. २०१४ पासून इंधनाचे दर कमी असताना जो फायदा झाला त्याचा लाभ तुम्ही देशातील जनतेला आता का देत नाहीत? असा सवाल काँग्रेसने केला आहे. देशातील खासगी तसेच सरकारी कंपन्यांना “भरघोस नफा” कमावण्याचा परवाना देण्यात आला होता. तेव्हा जनतेला वाढलेल्या दरानेच इंधन विकले जात होते, असे गौडा म्हणाले. दुसऱ्या प्रश्नात काँग्रेसने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर अद्याप का झालो नाही? असा सवाल केला. आंतरराष्ट्रीय तेल पुरवठादारांशी व्यापार करताना देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
तिसऱ्या प्रश्नात गौडा यांनी मोदी सरकारवर अर्थव्यवस्था व महागाईबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. “तुम्ही जनतेला सर्व काही ठीक व सकारात्मक आहे असे का सांगत होतात? वास्तवात, त्यांनी मतदान केल्यानंतर तुम्ही किंमती वाढवून त्यांच्या पाठीत सुरा खुपसला नाही का?”, असा सवाल उपस्थित करण्यात आला. “महागाईचा जो परिणाम होतोय तो रोखण्यासाठी तुम्ही काय उपाय करत आहात? वाढत्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, त्यासाठी तुम्ही काय करत आहात?”, असा चौथा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रूबियोंनी घेतली मोदींची भेट
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अमेरिका व भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबिओ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे आमंत्रणही दिले. गेल्या वर्षभरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले शुल्क, व्हिसावरील निर्बंध, अनिवासी नागरिकांची हकालपट्टी आणि पाकिस्तानशी वाढवलेली जवळीक यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना मोठा तडा गेला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतावर आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम झाला आहे. देशात इंधनाच्या किमती वाढल्या असून इतर जीवनावश्यक वस्तूंवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ २६ मे रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम पेज हॅक
कॉक्रोच जनता पार्टी या राजकीय व्यंग चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी कॉक्रोच जनता पार्टी या नावाने सुरू करण्यात आलेले ‘एक्स’ अकाउंट सरकारने “सुरक्षेच्या कारणास्तव” बंद करण्याचे निर्देश ‘एक्स’ला दिले होते. त्यानंतर ‘एक्स’ अकाउंट बंद करण्यात आले होते. कॉक्रोच जनता पार्टीचे आता इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती दीपके यांनी दिली. इन्स्टाग्रामवर फोलोअर्सच्या बाबतीत कॉक्रोच जनता पार्टीने भाजपा व काँग्रेसला मागे टाकले होते. दीड कोटीहून अधिक जणांनी इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीला फॉलो केले होते. अभिजीत दीपके म्हणाले, “कॉक्रोच जनता पार्टीवर कारवाई करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम पेज हॅक झाले. माझे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले. ट्विटर अकाउंट हॅक झाले. बॅक अप अकाउंटही हटवण्यात आले आहे.” सोशल मीडिया अकाउंट वरून करण्यात आलेली कोणतीही पोस्ट ग्राह्य धरू नका, कारण सोशल मीडियाचा एक्सेस गेला आहे, अशी विनंती दीपके यांनी आज त्यांच्या समर्थकांना केली आहे.
“आगीशी खेळू नका”, पश्चिम बंगाल सरकारला हुमायून कबीर यांचा इशारा
पश्चिम बंगालमध्ये एजेयूपी पक्षाचे अध्यक्ष हुमायून कबीर यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारला “आगीशी खेळू नका” असा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने मागील काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांचा कबीर यांनी विरोध केला आहे. गायींच्या हत्येवर प्रतिबंध, रस्त्यावर नमाज पठण करण्यास बंदी आणि मदरशांमध्ये वंदे मातरम् गायन बंधनकारक करणे, या निर्णयांना कबीर यांनी विरोध केला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने गोवंश प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी आणली आहे. गोवंशातील प्राण्यांना कत्तल खान्यात नेण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. या निर्णयाला हुमायून कबीर यांनी विरोध केला आहे. एकवेळ बीफ खाण्यापासून तुम्ही आम्हाला रोखा, पण, ईद निमित्त कुरबानी कोणत्याही परिस्थितीत दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी १९ वा ‘रोजगार मेळावा’ पार पडला. या कार्यक्रमादरम्यान विविध केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये ५१ हजारांहून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. युवकांसाठी रोजगाराच्या संधी बळकट करण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून, देशभरात आयोजित करण्यात आलेल्या १८ रोजगार मेळाव्यांमधून आतापर्यंत जवळपास १२ लाख नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

“आधी मुख्यमंत्री होतो का मंत्री होतो..?” आमदार बच्चू कडू यांचा सवाल…
विकास लवांडेंना न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळली….
राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक ; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा…
मराठा उपसमिती बरखास्त करा अन् स्वतंत्र मंत्रालय द्या..! मनोज जरांगेंनी सरकारकडे केल्या १० मागण्या….
विधानपरिषदेसाठी आता स्वीकृत नगरसेवकांना मिळणार मतदानाचा अधिकार..? मतदार याद्यांबाबत अद्याप संभ्रम….
आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका ; सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा….
कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट हॅक; बेरोजगारीवरून टीका होत असताना भाजपाकडून रोजगार मेळावा….