महसूल मंत्र्यांनी शब्द पाळला..! तहसीलदार गिड्डे यांच्या निधनानंतर दीड महिन्यातच पत्नीला नोकरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या भीषण अपघाती निधनानंतर राज्य सरकारने गिड्डे कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत त्यांच्या पत्नी नेहा राकेश गिड्डे यांना ‘गट क’ मधील नोकरीची अनुकंपा धर्तीवर संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शासनाने त्यांना बीड ऐवजी त्यांच्या सुलभतेसाठी सांगली जिल्ह्यात नोकरी देण्यास मंजुरी दिली असून, महसूल व वन विभागाच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.
अपघातानंतर महसूल मंत्र्यांनी पाळला शब्द
९ एप्रिल रोजी अंबाजोगाई-लातूर महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिड्डे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते, तसेच नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर तात्काळ नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नेहा गिड्डे यांनी २६ एप्रिल रोजी शासनाकडे नोकरीसाठी रीतसर अर्ज केला. बीडचे जिल्हाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्याकडून सकारात्मक अहवाल गेल्यानंतर, महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून सांगली जिल्ह्यात नोकरी देण्याचे आदेश जारी केले.
१७ जुलै २०२५ च्या नियमाचा आधार; सर्व स्तरांतून कौतुक
पतीच्या अकाली निधनानंतर नेहा गिड्डे यांच्या सुलभतेचा विचार करून, शासनाने दि. १७/०७/२०२५ च्या शासन निर्णयानुसार ‘विशेष बाब’ म्हणून बीड ऐवजी सांगली जिल्ह्यात नोकरी देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने नोकरशाहीतील लालफितीचा कारभार बाजूला ठेवून अवघ्या दीड महिन्यात गिड्डे कुटुंबाला न्याय दिल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी आणि महसूल वर्तुळाने शासनाचे विशेष आभार मानले आहेत.
निवासी नायब तहसीलदार पद का नाकारले?
शासनाचे अधिकृत आदेश प्राप्त होताच प्रशासनाने नेहा गिड्डे यांना सांगलीच्या मिरज तहसील कार्यालयात ‘निवासी नायब तहसीलदार या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नोकरी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, “नागरिकांची प्रचंड गर्दी आणि कामाचा अलोट ताण असलेल्या पदावर सध्या काम करण्याची माझी मानसिक स्थिती किंवा इच्छा नाही,” असे सांगत नेहा गिड्डे यांनी हे पद स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. यामुळे आता त्यांच्या इच्छेचा मान ठेवून त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात ‘गट-क’ मधील त्यांच्या आवडीच्या रिक्त पदावर नोकरी दिली जाणार असल्याची माहिती स्वतः नेहा गिड्डे यांनी दिली.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…