“१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे, मुदतवाढ नाही” :- प्रताप सरनाईक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. अमराठी रिक्षा- टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्पष्ट करत थेट इशारा दिला.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहन करताना, या प्रशिक्षणासाठी सुमारे ४ हजार शिक्षक सहभागी होणार असून, प्रत्येक महिन्यातील ४ शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान ४ तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. काही शिक्षक मानधनाशिवाय प्रशिक्षण देणार असून, काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
मानधनासाठी मराठी भाषा विभागाकडून दोन कोटींची तरतूद
मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर चालकांना प्रमाणपत्र
रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी प्रशिक्षण केंद्रांची अंतिम यादी निश्चित करून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या.
मराठी भाषा शिकली नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई
रिक्षा-टॅक्सी चालकांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यांनी विनामूल्य उपलब्ध असलेले ऑनलाइन अथवा ऑफलाइन प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चालकांच्या वेळेनुसार प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकली नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार मंत्री सरनाईक यांनी केला.
प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली तयारी:
सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रांतर्गत उपकेंद्रे उभारली जाणार आहेत.
रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर, रॅपिडो वाहनांवर मराठी संदर्भातील जनजागृती स्टिकर्स लावले जाणार आहेत.
मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी विशेष बॅनर्स तयार करण्यात येत आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…