विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालायकडून राजशिष्टाचार विभागाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.
नीलम गोऱ्हे यांना 2 ऑगस्ट 2024 च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये नीलम गोऱ्हे या पहिल्या शिवसेनेच्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नीलम गोऱ्हे यांची मोठी राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. नीलम गोऱ्हे या गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीच्या काळात रिपब्लिकन पक्षासोबत काम केलं. त्यांनी एकेकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबतही काम केलं. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही काम केलं. राष्ट्रवादीत काही काळ काम केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत महिला सशक्तीकरणासाठी काम केलं. तसेच त्या 2002 पासून विधान परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रचंड सामाजिक कार्य केलं. त्यामुळे पक्षाकडून त्यांची बढती होत गेली. राज्यात 2014 मध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा नीलम गोऱ्हे यांना मंत्रिपद किंवा राज्य मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. पण ते शक्य झालं नाही. यामुळे नीलम गोऱ्हे या नाराज झाल्याची चर्चा होती. पक्षाने नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेच्या उपसभापतीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. यानंतर नीलम गोऱ्हे यांची पुन्हा विधान परिषदेच्या उपसभापती निवड झाली.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर नीलम गोऱ्हे या सुरुवातीला ठाकरे गटात होत्या. पण काही महिन्यांनी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता शिंदे सरकारकडून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची या निमित्ताने मंत्रिपदाची इच्छा पूर्ण होणार आहे.