उपमुख्यमंत्री नसतांना “धरण वाहतंय” , राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांचा उत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पुण्यातील पूरस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता. ‘राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे… ते त्या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय.’, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला.
आता अजित पवारांनी राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येकाने बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे, राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे. “प्रत्येक पक्षाबद्दल एक आस्था असणारा एक वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे. आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाण यांनी जी शिकवण दिली त्याच्या बाहेर जाऊ नये,” असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
“काहीजण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला बघून घेईन म्हणतात. अरे काय बघून काय घेईन? संविधान, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही. वाचाळवीरांची संख्या आता वाढलीच आहे. स्वतकडे लक्ष केंद्रीत करण्याचं काम बंद झालं पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.