“मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष” ; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आज अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
यावेळी सूरज चव्हाण यांनी मनसे पक्षावर सडकून टीका केली. “मनसे हा पक्ष मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष आहे. मनसे पक्षातील पदाधिकारी हे अट्टल गुन्हेगार आहेत आणि अश्या लोकांची संख्या त्यांच्याकडे आहे. या लोकांकडून सुसंस्कृतपणा संदर्भात अपेक्षा ठेवू शकत नाही. आम्ही जिवंत आहोत असा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. अमोल मिटकरी यांना धमकी देणाऱ्या लोकांना मी सांगतो की, वेळ आणि तारीख तुम्ही ठरवा. जिथं यायचं आहे तिथे बोला आणि तुम्हाला आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. उगाच माध्यमांसमोर बूम आला तर काही बडबडू नये”, अशा खोचक शब्दांत सूरज चव्हाण यांनी मनसेवर टीका केली.
यावेळी सूरज चव्हाण यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा देखील उल्लेख केला. सूरज चव्हाण यांनी बाळा नांदगावकर यांना संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचं आवाहन केलं. “बाळा नांदगावकर तुम्ही माहिती घ्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काय बोलले होते? सुरुवात तुम्ही करायची आणि शेवट आमच्याकडून अपेक्षित करायची? राष्ट्रवादीकडून जशास तसं उत्तर येणार”, असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला.
‘गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी’, सूरज चव्हाण यांची मागणी
अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणी सूरज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल मिटकरी यांच्या संदर्भात दखल घ्यावी. मिश्यांना पीळ देणाऱ्या गावगुंडांना लवकर अटक करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सर्व गावगुंड आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे काय अपेक्षा ठेवायची?”, असं सूरज चव्हाण म्हणाले.
सूरज चव्हाण यांचा सुप्रिया सुळे यांना सल्ला
खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत संसदेत टीका केली. त्यांच्या या टीकेवरही सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. “खासदार सुप्रिया सुळे यांना ७ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी जे संसदेत बोलले आहेत त्यात काही पुरावे आहेत का? ऐकीव गोष्टीवर बोलणं योग्य नाही. त्यांनी आपली चूक सुधारावं”, असं आवाहन सूरज चव्हाण यांनी केलं.
‘सर्व आमदार हे अजित पवार यांच्यासोबत’
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात तरुणांना संधी दिली जाणार आहे. यावरही सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार यांच्यांवर मी बोलणार नाही. ते तरुणांना संधी देणार हे चांगलं आहे. त्यांच्याकडे किती तरुण राहिले आहेत?”, असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला. “या आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू आणि सर्व आमदार हे अजित पवार यांच्यासोबत कायम राहणार आहेत. आम्ही अलका कुबलची भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार नाहीत. आम्ही कामे केली आहेत. ती कामे घेऊन जनतेत जाऊन मत मागणार”, असं सूरज चव्हाण म्हणाले.
‘जितेंद्र आव्हाड हे सामाजिक ऐक्य बिघडवण्याचं काम…’
“महायुतीमध्ये जसे वाद आहेत तसे वाद हे महाविकास आघाडीमध्येही आहेत. आम्ही एकत्र बसून सगळे प्रश्न तरी सोडवतो. पण महाविकास आघाडीमध्ये असं काही होत नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परस्पर जाऊन जागा जाहीर करतात. त्यांच्याकडे समन्वयाचा अभाव आहे”, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. “माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर जास्त लक्ष द्यावं. जितेंद्र आव्हाड हे सामाजिक ऐक्य बिघडवण्याचं काम करत आहेत. हिंदू आणि मुस्लिम यात वाद सातत्याने वाद होत आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.