“भाजपा सरकारमध्ये सहभागी होण्याचा विषय माझ्याकडे आलेला नाही”, शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मंत्रीपदाची शपथ घेतली त्याचा..”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. मतदार आणि सामान्य माणसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या बळावर पुढील तीन-चार महिन्यांत पक्ष पुन्हा नव्या ताकदीने उभा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे आज सातारा कराड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत झाले. यावेळी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आपण पाठिंबा देऊन मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावे, अशी कोणतीही चर्चा माझ्याशी मागील काही दिवसांमध्ये कोणीही केलेली नाही आणि या विषयाची मला कोणतीही माहिती नसल्याचे पवार यांनी सांगून याविषयी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
आज भारतीय जनता पार्टी देशामधील समाजासमाजामध्ये आणि जाती-धर्मांमध्ये वेगळं वातावरण तयार करत आहे. त्यांच्याशी आपल्याला लढायचं आहे आणि ही महाराष्ट्रातील बहुसंख्याकांची भूमिका आहे. त्याला अनुसरून राज्यामध्ये पुढील तीन-चार महिन्यांत राज्यव्यापी दौरा करून सर्वसामान्य माणूस मतदार आणि लोकांमध्ये जाऊन पक्ष उभा केला जाईल. आम्ही लोकांनी कष्ट केले. या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला तर माझी खात्री आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला अनुकूल चित्र दिसेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
रविवारी माझ्या काही सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्याचा परिणाम पक्षावर काही होणार नाही. पक्ष उभारणीसाठी पुन्हा शिवधनुष्य उचलणे वगैरे असे काही होणार नाही. आज संपूर्ण राज्यामधील चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल आहे. यासाठी पक्ष कार्यकर्ते आणि सर्वांचे मनोबल खचू नये यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
ज्या सहकाऱ्यांनी भाजपा मंत्रिमंडळात शपथ घेतली ते सर्व ईडीला घाबरून गेले यात काही तथ्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी आमच्या पक्षावर आणि सहकाऱ्यांवर जे आरोप केले होते त्याची त्यांनी योग्य ती माहिती घेतलेली नव्हती. त्यांनी चुकीचे आरोप करून आमच्या सहकाऱ्यांवर अन्याय केल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
ज्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले नाही, खर्च करावा लागला नाही, असे जे केवळ उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाच्या जिवावर निवडून आलेले सदस्य व सहकऱ्यांना चुकीचा सल्ला देत आहेत, असा टोला शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना लगावला.अजित पवार हे परत पक्षाकडे येणार याविषयी मला काही माहीत नाही, तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.
ज्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याबद्दल काहीही वाईट वाटत नाही. यांच्याबाबतचे निर्णय मी घेण्यापेक्षा मतदार आणि सामान्य माणूस घेत असतो आणि त्यांचे निर्णय मतदार योग्य वेळी घेतील. हे सर्वजण अपात्र होणार की निलंबित होणार याचा निर्णय पक्षाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी घेतील. ज्या सहकाऱ्यांनी हे केलं ते योग्य नाही आणि मला त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. पक्षाचे संख्याबळ कमी जास्त होत असते. त्याची फिकीर करण्याचं काही कारण नाही. मला त्याची सवय आहे, असे शरद पवार म्हणाले.
जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भारतीय जनता पक्षासोबतदेखील जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कुठलीही अडचण नाही, असे अजित पवार म्हणाल्याचे लक्षात आणून देताच शरद पवार म्हणाले, आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो. अडीच वर्षे आम्ही शिवसेनेसोबत काम केले. त्यांच्याबरोबर मंत्रीपदे घेतली, काहीतरी घडतंय हे आज कळलं, हे अडीच वर्षांपूर्वी ज्यावेळी आम्ही सरकार स्थापन केलं आणि त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती त्यावेळी शिवसेनेबद्दलची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले.
विधानसभा अध्यक्षांनी कोणाकडे जायचे आणि कोणाला विचारून काही निर्णय घ्यायचे याबाबत सध्याचे अध्यक्ष आणि काही मर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि आमदार यांना संसदीय संस्थांची एक नियमावली आणि मर्यादा आहेत. त्याचं त्यांनी योग्य ते पालन करावं. नाहीतर लोक सभापतीबद्दलसुद्धा योग्य ते निष्कर्ष काढतील आणि निर्णयही घेतील, असेही पवार म्हणाले.