“४० आमदारांच्या जीवावर पक्ष बनत नाही, पक्षासाठी.” ; अजित पवार गटावर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील राजकीय घडामोडी शिगेला पोहोचल्या आहेत. सातत्याने दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करत त्यांना अपात्र करावे अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
तसंच, जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पद रद्द करून त्याजागी सुनिल तटकरे यांची नियुक्ती केली आहे. अजित पवारांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. ही घोषणा होताच जितेंद्र आव्हाडांनी लागलीच पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला किटी पार्टी संबोधलं आहे. तसंच, संविधानाचा, निवडणूक आयोगाच्या नियमांचा आणि पक्ष घटनेचा उल्लेख करत त्यांनी अजित पवारांनी केलेले बंड हे बेकायदा असल्याचे सांगितले आहे.
“(अजित पवारांच्या)पत्रकार परिषदेत पंतप्रधान, राष्ट्रपतींची नियुक्ती झाली. विविध पदे वाटण्यात आली. त्याला कायदेशीर संवैधानिक मान्यता होती का? त्यांना कायदेशीर आणि संवैधानिक मान्यताच नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत, तिथे बसलेल्या सर्वांनी मान्य केले आहेत. पार्टीच्या घटनेत पक्षाचे अधिकार पक्षाध्यक्षाकडेच असतात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या घटनेच्या नियमानुसार पक्षाच्या अध्यक्षांचे जे अधिकार आहेत, त्यानुसारच, अध्यक्षांना पदावरील व्यक्तीचे पद रद्द करण्याचा अधिकार असतो. पक्षाला घातक ठरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचा अधिकार पक्षाध्यक्षांना आहे”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे जयंत पाटलांकडून काढून घेतलेलं प्रदेशाध्यक्षपद हे बेकायदा कृती असल्याचं ते म्हणाले.
“४० आमदारांच्या जीववर पक्ष बनत नाहीत. इथं पदाधिकारी बसलेत, ही पक्षाची ताकद. आजची पत्रकार परिषद ही किटी पार्टीसारखी होती. अशी पार्टी चालत नाही. एका पक्षात जेव्हा फूट पडते तेव्हा संविधान कोणाकडे आहे, निवडणूक आयुक्तांनी दिलेलं संविधान कोणाकडे आहे? यावर निर्णय होतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातही तेच म्हटलं आहे की अध्यक्षांनीही संविधान कोणाच्या हातात आहे याचा विचार करावा”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली जी घटना सादर झाली त्यालाच संविधान मिळाले आहे. शिवसेनेच्या बाबतीत दिललं हे जजमेंट ऐतिहासिक निर्णय असेल असं मी तेव्हाच म्हणालो होतो. या जजमेंटच्या बाहेर कोणालाच जाता येणार नाही. म्हणूनच, १६ जणांविरोधात डिसक्वालिफिकेशन मान्य करावं लागेल. त्यामुळे आताच्या प्रकरणातही पक्षाध्यक्षांचाच आदेश मान्य करावा लागेल. त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीला वैधता नाही. उरलेल्यांनाही फक्त एकच संधी आहे की पवारांना संपर्क साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत इतकंच सांगा. आम्ही कोणालाही घाबरवत नाही”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची घटनाच वाचून दाखवली. तसंच, त्यांच्या अपात्रेसाठी असलेली दाखल केलेली याचिकाही बेकायदा असल्याचे त्यांनी सांगितले.