“जातीवाद व फोडाफोडी करणाऱ्या शक्तिंना जनता उलथवून टाकेल”, शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल……

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देदेशातील लोकशाहीला धक्का देऊ पाहणाऱ्या अपप्रवृत्तींकडून देशभर जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात संघर्ष कसा होईल याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक राज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु असून, त्याला काही लोक बळी पडल्याचा हल्लाबोल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चढवला.
शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील पण आपली सामुहिक शक्ती मजबूतच ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल रविवारी मोठी फूट पडून अजित पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार व भुजबळांसह नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विलक्षण राजकीय घडामोडीच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार हे होते. लगेचच त्यांनी पत्रकार परिषदेत ईडीच्या भीतीपोटी काहीजण चुकीच्या मार्गाने गेले आहेत. परंतु, गेलेल्यांपैकी अनेकजण आपल्या संपर्कात असून, ‘थांबा आणि पहा’ असा सूचक इशारा संबंधितांना दिला होता. तसेच उद्या आपण माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराडमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे पवार आज गुरुपौर्णिमेदिवशी येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नतमस्तक झाले. या वेळी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राहिलेली उपस्थिती सर्वदूर चर्चेत राहिली. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मात्तबर नेते उपस्थित होते. याच बरोबर मोठ्या जोशात हजारो कार्यकर्ते हजर राहत त्यांनी घोषणाबाजी करत शरद पवारांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला.
कृष्णा घाटावर आयोजिलेल्या सभेत शरद पवारांनी भाजप आणि बंडखोरांविरोधात कडव्या संघर्षाचा नारा दिला. ते म्हणाले की, आपला देश गांधी-नेहरूंच्या विचारांचा आहे. महाराष्ट्रतर बंधुत्व आणि इमानदारीचा पुरस्कार करणारे राज्य आहे. पण, महाराष्ट्र आणि देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे पाप अपप्रवृत्तींकडून सुरु आहे. भाजपकडून होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला अनेकजण बळी पडले. महाराष्ट्रात उलथापालथ करण्याचा सतत घाट घातला जात आहे. परंतु, अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही. दुष्कृत्यांना उलथवून लावल्याखेरीज स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा शरद पवारांनी विरोधकांना दिला.
मध्यंतरी अमरावती, धुळे, कोल्हापूर या सारख्या पुरोगामी विचारांच्या शहरात सामाजिक वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जातीय दंगली घडवल्या गेल्या. हे सारे महाराष्ट्राला समजून येणारे असल्याने या वाढत्या समाज विघातक प्रवृत्तींविरोधात संघर्षाची भूमिका घेऊन महाराष्ट्र उभा राहील असा विश्वास देत यासाठी आपण महाराष्ट्रभर दौरे करून लोकांमध्ये जाणार आहे. या राज्यातील जनतेवर आपला ठाम विश्वास असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार जातीय प्रवृत्तीने पाडले. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर मध्यप्रदेश, कर्नाटक आदी विविध राज्यांमधील विरोधी पक्षांची सरकारं उलथवून टाकण्याचे काम या प्रवृत्तीने केले. आणि जातीय दंगलींना प्रोत्साहन देणारी सरकारं सत्तेत आली. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आदी राज्य सरकारे पाडण्याचा अजूनही प्रयत्न सुरु असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपचा नामोल्लेख टाळत केला. हे सारे घडत असताना या विरोधात संघर्ष करण्याची सुरुवात कुठून करायची ते स्थळ म्हणजे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आणि त्याचे दर्शन घेऊन आपण धर्म, पंथ याचा वापर करणाऱ्या शक्तींविरोधात लढ्यास सुरुवात करीत आहे. सामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार जतन केला पाहिजे. समाज सदैव प्रगतीच्या वाटेवर नेला पाहिजे हे चव्हाण साहेबांचे धोरण होते आणि त्यांच्या विचारांची काळजी घेत आमची वाटचाल कायम राहणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.
गर्दीत अनेकांची हेळसांड
दरम्यान, अगदी सकाळपासूनच राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होत होते. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे बहुतेक आमदार व नेत्यांनी या वेळी समर्थकांसह शरद पवार यांना पाठींबा देण्यासाठी एकच गर्दी केली. या वेळी झालेल्या किरकोळ चेंगराचेंगरीत मान्यवरांसह माध्यम प्रतिनिधी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी हेळसांड झाली. अखेरीस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच शरद पवारांभोवती स्वत: सुरक्षा कवच म्हणून जबाबदारी पेलत त्यांना सभास्थळापर्यंत नेले. माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार अंकुश काकडे आदी चेंगराचेंगरीत सापडले. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवारांच्या दौऱ्याचे नेटके नियोजन केले होते.
शक्तीप्रदर्शन अन् पाठींब्याचा जोश
राष्ट्रवादीतील मोठ्या बंडानंतर या विरोधात संघर्षास उतरलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पाठींबा देण्यासाठी कराडच्या कृष्णा घाटावर हजारो कार्यकर्ते मोठ्या जोशात उपस्थित झाले होते. आमदार बाळासाहेब पाटील कार्यकर्त्यांनी पवारांच्या समर्थनार्थ फलक लावले होते. अनेकजण हातात पाठींब्याचे फलक घेऊन सहभागी झाले होते. एकीकडे शरद पवारांचा जयघोष करताना नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांबरोबरच अजित पवार व फुटीर नेत्यांविरोधात घोषणा दिल्या जात होत्या.