मुख्य प्रतोदपदी शरद पवार यांच्याकडून आव्हाड, अजित पवारांकडून अनिल पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड तर अजित पवार यांच्याकडून मुख्य प्रतोद पदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल पाटील हे या अगोदरही या पदावर होते. मात्र, अजित पवार यांनी रविवारी त्यांची फेरनियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मुख्य प्रतोदपदी नियुक्त्या केल्यामुळे विधानसभेत पेच निर्माण होणार आहे. आता विधानसभा अध्यक्ष कोणाला मान्यता देतात, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबत पक्षाला कळविले नाही. नियमानुसार त्यांनी कळविणे आवश्यक होते, असे सांगितले. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला की नाही, याबाबत माहीत नाही. पण विधानसभेत राष्ट्रवादीची जास्त संख्या आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेता म्हणून आव्हाड यांची नियुक्ती केली असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार यांनी रविवारी सकाळी विधानसभा सदस्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर राजभवनावर जाऊन शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. या कृतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. राज्यातील पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्याच सोबत आहेत, असा दावाही पाटील यांनी केला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कार्यकारिणीची बुधवारी दुपारी 1 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक आयोजित केली आहे.