बदलत्या राजकीय घडामोडीत भाजप दणकट; ‘मविआ’पुढे आता मोठे आव्हान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्याचे परिणाम जळगाव जिल्ह्यातही जाणवले. पक्षातील एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील पक्षातून बाहेर पडले आहेत.
या फुटीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’साठी आता मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीपासूनच मोठी कसरत करावी लागणार आहे, तर भारतीय जनता पक्षाची स्थिती दणकट झाली आहे.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येण्यासाठी वरील दोन्ही मतदारसंघात विजयी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच त्यांच्याविना भाजपला लोकसभा निवडणूक लढवावी लागणार होती.
मात्र, त्यांच्यासोबत शिवसेना (शिंदे गट) होता. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट), कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस होते. त्यात श्री. ठाकरे यांना सोडून शिंदे गट वेगळा झाला. त्यामुळे श्री. ठाकरे यांच्यासोबत जनतेची सहानभूतीही होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून ३५ आमदारांसह भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णयही जाहीर केला. अमळनेर येथील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील अजित पवार यांच्यासमवेत गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीचा पहिला फटका अमळनेर तालुक्यात बसला. जळगाव लोकसभा मतदारसंघात अमळनेर तालुका आाहे.
या मतदारसंघात शिंदे गटाचे गुलाबराव पाटील मंत्री आहेत. आता राष्ट्रवादीचेही अनिल पाटील मंत्री. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे ‘मविआ’त लोकसभेसाठी ‘राष्ट्रवादी’ कितपत दावा कायम ठेवणार, हाच खरा प्रश्न आहे.
‘मविआ’ने दुसरा उमेदवार दिला, तरी त्याच्यांपुढे मोठे आव्हान असणार आहे. आजच्या स्थितीत भाजप जळगाव लोकसभेत बळकट असला, तरी त्यांच्यातील उमेदवारीबाबत अद्यापही निश्चितता नाही. त्यामुळे आता भाजपचा उमेदवार ‘राष्ट्रवादी’तून आयात असेल, की विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिली जाईल, हे आतापुढे दिसून येईल.
रावेरमध्येही ‘मविआ’ला आव्हान
रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. श्रीमती रक्षा खडसे खासदार आहेत. एकेकाळी भाजपचे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. श्री. खडसे अद्याप शरद पवार यांच्यासोबतच आहेत. मतदारसंघातही अजित पवार यांचे मोठे समर्थक आहेत. सध्या ते काठावर आहेत.
भविष्यात ते अजित पवार यांना साथ देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला किंवा शिवसेना किंवा कॉंग्रेसकडे गेला, तरी ‘मविआ’च्या उमेवारासमोर मोठे आव्हान असणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही जामनेर मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात आहे. मंत्री महाजन यांना आता ‘राष्ट्रवादी’चे मंत्री अनिल पाटील यांची साथ मिळणार आहे.
सोबत शिंदे गट आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार बळकट राहणार आहे. खासदार रक्षा खडसे उमेदवारीच्या भक्कम दावेदार आहेत. मात्र, भाजप या ठिकाणी भाकरी फिरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात उमेदवार कोण, हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असे मंत्री महाजन यांनी सांगितले आहे.
माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे लोकसभेची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ‘राष्ट्रवादी’त पडलेल्या फुटीचा व जिल्ह्यात राष्ट्रवादीला मिळालेल्या मंत्रिपदामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.