राष्ट्रवादीचे नेते हे सत्तापिपासू :- डॉ. मोहम्मद नदीम…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- १९९९ पासून राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी काँग्रेसच्या भरोशावरच सत्तेचा मलिदा लाटलेला आहे. सन १९९९ लाच जर काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या या सत्तापिसासू मंडळीला जवळ केले नसते तर, आतापर्यंत ही मंडळी राजकीय दृष्ट्या पूर्णपणे संपली असती. ही मंडळी सत्ते शिवाय जगूच शकत नाही, ही बाब आज पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ मोहम्मद नदीम यांनी व्यक्त केली.
आज घडलेल्या या राजकीय घडामोडींवर अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.असाच संताप व्यक्त करत, याबाबत पुढे बोलतांना डॉ नदीम म्हणाले की, राज्यात काँग्रेस पक्षाच्या सहकार्यामुळेच राष्ट्रवादीची ही मंडळी जिवंत होती व प्रगती करत होती.काँग्रेस मधील मी व माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते व नेते राज्यात राष्ट्रवादी सोबत आघाडी असू नये या विचाराचे होतो, कारण राष्ट्रवादी ची ही मंडळी सोबत असली तरी त्यांचा काँग्रेसला काही उपयोग होत नव्हता. उलट ते सोबत असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे मागील पंधरा-वीस वर्षात मोठे नुकसान झालेले आहे. सन २०१४ मध्ये सुद्धा निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीच्या लोकांनी काँग्रेस पक्षाला धोका देऊन अडचणीत आणले होते. परंतु निवडणुकीच्या नंतर पुन्हा काँग्रेसने त्यांना जवळ केले होते. एकूण राजकीय परिस्थितीमुळे त्यांना दूर करणे शक्य नव्हते. परंतु आज ते स्वतः बाजूला झाल्यामुळे काँग्रेस पक्ष निश्चित पणाने बळकट होईल याची मला खात्री आहे.
राज्यातील जनता ही काँग्रेसपक्ष आणि उद्धव ठाकरेंची सेना यांच्या सोबत आहे, म्हणून महाराष्ट्रात मा.उद्धव ठाकरेंची सेना आणि काँग्रेस एकत्रित असल्यास पुढील होणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त होईलच,यात शंका नाही. महाराष्ट्रात काँग्रेसपक्ष आता अधिक मजबूत होईल आणि सत्तेत येईल, याची मी खात्री देतो, असेही डॉ.नदीम यावेळी म्हणाले.