पवार कुटुंबीयांनी एकसंघ रहावे, बारामतीकरांची अपेक्षा…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शविला. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आपल्याला माहिती नव्हता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज संध्याकाळ नंतर सर्व चित्र स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार, शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी एकदिलाने काम करावे व त्यांनी पुन्हा पूर्वीसारखे एकत्रित यावे, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे चित्र व्यथित करणारे आहे, पक्षांमध्ये तसेच कुटुंबामध्ये कोणतीही फूट पडू नये, अशीच राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे. पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी वैशाली नागवडे यांनी देखील फेसबुक वर अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करत कुटुंबियांनी एकत्र राहून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे, या सर्व प्रक्रियेमध्ये कार्यकर्ता अस्वस्थ असून कार्यकर्त्यांचा देखील विचार व्हायला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.
त्यांच्याप्रमाणे बारामती शहरात देखील कार्यकर्त्यांनी तुम्ही कोणाच्या बाजूने असा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही पवार कुटुंबीयांच्या बाजूने आहोत, अशी भावना व्यक्त केली.
शरद पवार किंवा अजित पवार यांच्यात एकाची निवड करणे बारामतीकरांसाठी अशक्य आहे, आम्ही पवार कुटुंबीयांच्या पाठीमागे इतके वर्ष राहिलो आहे आणि या पुढील काळात देखील पवार कुटुंबीयांसोबतच राहण्याची इच्छा असल्याची भूमिका सर्वसामान्य नागरिकांनी देखील बोलून दाखवली.
त्यामुळे या पुढील काळात राष्ट्रवादी पक्ष, पवार कुटुंबीय या दोन्ही स्तरावर नेमके काय घडणार, याकडे बारामती सह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. ही राजकीय लढाई कौटुंबिक स्तरावर येऊ नये व कुटुंब एकसंघ राहावे आणि पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकत्रितपणे राजकीय वाटचाल करावी, अशी तळागाळातील कार्यकर्त्यांची भावना आहे.