अजित पवारांच्या निर्णयाने शिंदेसेनच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांची चिंता वाढली ; मंत्रिपदावर टांगती तलवार….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. तर अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे नव्या मंत्र्याच्या एन्ट्रीमुळे आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटाच्या (Shinde Group) पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे आता अजित पवारांच्या या निर्णयाने ‘त्या’ पाच मंत्र्यांची चिंता वाढली आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठक झाली असल्याची चर्चा आहे. तर मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील नेते नाखूष असल्याचे या बैठकीत पाहायला मिळाले असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे शिंदे गटाचे संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना मंत्रिपदावरुन हटवून त्यांच्याजागी इतर आमदारांची निवड करण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा होती. त्यात आता अजित पवार सत्तेत सामील झाल्यावर आणि त्यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांची पदे जाण्याची शक्यता असून, त्यांची चिंता वाढली आहे.
‘त्या’ पाच मंत्र्यांची चिंता वाढली
शिंदे गटाचे संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांची मंत्रिपदे धोक्यात असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यात आता अजित पवारांसह 9 राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या ‘या’ पाच मंत्र्यांना आपले मंत्रिपद जाणार का? याची चिंता वाटत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी कोणत्या घडामोडी घडतात आणि या पाच मंत्र्यांचे मंत्रिपद जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊतांची टीका…
दरम्यान आज घडलेल्या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसली होती. मात्र आजच्या निर्णयाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. तसेच आजच्या शपथविधीच्या वेळी या आमदारांचे चेहरे पाहण्यासारखी होती, असे संजय राऊत म्हणाले आहे.