सत्तेच्या सारीपाटात अजित पवारांची एन्ट्री…! शिंदे गटाचं काय होणार..? मंत्रीपदाचा स्वप्न हवेतच विरणार..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- रविवारी दुपारी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते एकामागोमाग एक मंत्रीपदाची शपथ घेत होते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे मोबाईलमध्ये लक्ष गंतवून होते.
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सगळेच मंत्री आपली नाराजी कॅमेरात दिसणार नाही याची काळजी घेत होते. पण त्यांची नाराजी काही केल्या लपत नव्हती. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला मिळणारी मंत्रीपदं आता राष्ट्रवादीकडे गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे आपल्यालाच मंत्रीपद मिळणार असा ढोल बडवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांचं काय होणार असा सवाल आता विचारला जात आहे.
मंत्रीमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल अशी आशा शिवसेनेच्या अनेक नेत्यांना होती. वर्षभर लांबलेला विस्तार अखेर आज झाला, पण या विस्तारात शिवसेनेच्या एकाही नेत्याला मंत्रीपद मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच झटक्यात नऊ मंत्रीपदं गेल्याने, भविष्यात फार काही हाती लागेल अशी अपेक्षाही संपल्याने शिवसेनेमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या 288 इतकी आहे. नियमानुसार 15 टक्के म्हणजे जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. त्यात शिवसेनेकडे दहा आणि भाजपकडे दहा मंत्रीपदं आहेत. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्र्यांची संख्या 29 इतकी झाली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता आता 14 मंत्रीपदं शिल्लक आहेत.
कोणत्याही सरकारात सगळी मंत्रीपदं भरली जात नाहीत. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झालाच तरी जास्तीत जास्त दहा ते बारा मंत्रीपदे भरली जातील. भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 105 इतकी आहे. त्यामुळे भाजपने जर पाच मंत्रीपदांवर दावा सांगितला तर शिवसेनेच्या हाती दोन ते तीन मंत्रीपदांपेक्षा फार काही लागू शकत नाही.
शिवसेनेच्या नेत्यांची हीच अस्वस्थता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीच्या नजरेतून सुटली नाही. संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय बांगर यांसारखे शिवसेनेचे नेते तर आपण मंत्री होणारच या थाटात वावरत होते. मंत्रीपदाची त्यांची तयारी तर अनेकदा सभागृहात थट्टेचा विषय बनली होती.
सत्तेच्या सारीपटात आता अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे सरकार टिकवण्यासाठी भाजपला आता शिवसेनेची या आधीइतकी गरज उरलेली नाही. शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत आल्यापासून वादात सापडलेले सर्वाधिक मंत्री शिवसेनेचेच आहेत. जाहिरात वादानंतर भाजपने शिवसेनेला सपशेल माघार घ्यायला लावली होती. जागावाटपाच्या चर्चेवरुन खासदार श्रीकांत शिंदेना तर थेट राजीनाम्याची भाषा करावी लागली होती. हा सगळा दबाव कायम असतानाच आता राष्ट्रवादीची एन्ट्री शिवसेनेच्या अस्तित्वावरच येणार की काय अशी चिंता सेना नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही तरच नवल.
मंत्रीपदासाठी शिंदे गटाचे इच्छुक नेते
मंत्रीपदासाठी शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय बांगर, योगेश कदम, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे आणि बच्चू कडू हे नेते इच्छुक आहेत.