“.त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात कुणीही नाही”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल….!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांनी १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून ४० आमदार फोडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं होतं.
तेच लोक आता एकनाथ शिंदे यांना बेईमान म्हणत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते जळगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले, “मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, काही लोक आमच्या सरकारला नावं ठेवतात. काल-परवा राष्ट्रवादीचे लोक म्हणाले की, आम्ही बेईमानीने सरकार स्थापन केलं. त्यामुळे मी त्यांना आठवण करून दिली की, १९७८ साली शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. ते सरकारमधील ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी बेईमानी केली, असं कुणीही म्हटलं नाही. त्यांनी तेव्हाच्या भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यांना कुणीही बेईमान म्हटलं नाही. त्याला पवारसाहेबांची मुत्सद्देगिरी म्हटलं. मग आमच्या एकनाथ शिंदे यांनी तर भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती.”
“पण जेव्हा उद्धव ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. तेव्हा विचार आणि विकासाठी एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतली. शरद पवारांप्रमाणे तेही ५० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांचं वागणं मुत्सद्देगिरी असेल तर एकनाथ शिंदेंचं वागणंही मुत्सद्देगिरीच आहे. तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाही. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय, असं चालणार नाही,” असं फडणवीसांनी नमूद केलं.
“याउलट एकनाथ शिंदे तर भाजपाबरोबर निवडून आले होते आणि त्यांनी भाजपाबरोबरच सरकार स्थापन केलं. त्यामुळे जे लोक त्यांना बेईमान म्हणतात, त्यांच्यापेक्षा मोठे बेईमान आणि त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात दुसरं कुणीही नाही. अशा गद्दारांना पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता जागा दाखवून देईल,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.