शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा मुंबईत मेळावा ; उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक येत्या जून महिन्यात रंगशारदा येथे घेण्याचा तसेच ऑगस्ट महिन्यात संयुक्त मेळावा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा येत्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची एकत्रित बैठक आज शिवसेना भवन येथे झाली. बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते विजय कदम, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, राष्ट्रीय प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे व सौरभ खेडेकर उपस्थित होते. बैठकीत पुढील वाटचालीबाबत चर्चा झाली.
महाराष्ट्रहितासाठीच…
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त पत्रकार परिषद ऑगस्ट 2022 मध्ये झाली होती. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत यापुढे एकत्र सामाजिक, राजकीय चळवळीत राहण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत असून महाराष्ट्रहिताच्या पुढील वाटचालीसाठीच येत्या ऑगस्ट महिन्यात संयुक्त मेळावा होणार आहे.