विधानपरिषदेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर ; पाहा नावे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नाशिक पदवीधर मतदार संघासह 5 जागांसाठी महाविकास आघाडीने आज (गुरुवार) आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रीत बैठक घेत आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली.
यामध्ये सत्यजीत तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
नाशिक- शुभांगी पाटील, नागपूर- सुधाकर आडबाले, कोकण- बाळाराम पाटील, औरंगाबाद- विक्रम काळे, अशी नावे घोषीत करण्यात आली आहेत. या उमेदवारांची अधिकृत घोषणा काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावेळी शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाचही जागा जिंकणार आहोत. मागच्या 5 वर्षात केंद्राने जनतेची गळचेपी केली, ज्या राज्यात आमची सत्ता आली त्या राज्यात आम्ही जुनी पेन्शन लागू केली आहे. यामुळे जनता आमच्या पाठीशी राहत आहे. जगात मोठा पक्ष म्हणून गवगवा करणाऱ्या भाजपला नाशिकसारख्या ठिकाणी भाजपला नेता मिळाला नाही. यासगळ्याचा विचार केला तर नाशिकसह पाचही विधानपरिषदेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार यात शंका नाही. सुधीर तांबे यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे. याचबरोबर बाळासाहेब थोरात यांची तब्बेत खालावली आहे. ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते आल्यावर आपली भूमिका मांडतील असे, नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ‘सत्यजित तांबे सहज निवडून येतील पण भाजपचा पाठिंबा घेतला तर..’ असे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, चर्चांना उधाण आले आहे.