मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत भाजपा-शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन, ठाकरेंच्या अंगणात पोस्टरबाजी ; मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं बिगुल वाजणार..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया (गुरुवार, १९ जानेवारी) रोजी मुंबईत विविध विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा व शिंदे गटाकडून जोरदार मुंबईत शक्तीप्रदर्शन होताना पाहयला मिळत आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोदी, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांची पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
पोस्टरबाजीतून शक्तीप्रदर्शन.
तर दुसरीकडे ठाकरे गटाला डिवचण्यासाठी ठाकरेंच्या अंगणात म्हणजे वाद्र्यातील कला नगर या परिसरात भाजपा व शिंदे गटाने मोठी पोस्टरबाजी केली आहे. दरम्यान, यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपा व शिंदेकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जातंय.
श्रेयाची लढाई
मोदींच्या दौऱ्याचे नियोजनासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र महानगरपालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यापैकी बहुतांश प्रकल्पांचे नियोजन हे शिवसेनेच्या कार्यकाळात झाले असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई जुंपली आहे.
प्रचाराचं बिगुल वाजणार?
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. गेली २५ वर्षे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून मुंबईवर शिवसेनेची पकड आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळं या निमित्त मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी असल्याचं म्हटलं जातयं. तसेच यानिमित्ताने पालिका प्रचाराचे बिगुल वाजणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सीएसएमटी पुनर्विकासाची पायाभरणी
ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाची पायाभरणी १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्राकडे पाठवला होता. पुनर्विकासाचा एकूण खर्च एक हजार ८१३ कोटी रुपये आहे.