एक अफवा पसरली अन् पाहता पाहता…; शेंबाळपिंपरीत मोठा पोलीस बंदोबस्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. गेल्यावर्षी मकर संक्रांतीलाच नामफलकांच्या वादावरून येथे दंगल झाली होती.
त्यामुळे पोलिसांनी आजच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत परिस्थिती आटोक्यात आणली.
शुक्रवारी सकाळी गावातील एका युवकाने व्हाट्सअपवर आक्षेपार्ह चित्रफीत टाकून गेल्यावर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती देण्यासाठी येथील काही युवक खंडाळा ठाणेदारांकडे गेले. यावेळी ठाणेदारांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन शांततेचे आवाहन केले.
मात्र आज गावातील नामफलकाच्या ‘त्या’ वादग्रस्त ठिकाणी दगडफेक करण्यात येत असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. सध्या शेंबाळपिंपरीत तणावपूर्ण शांतता आहे. खंडाळा पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरल करणारा युवक हैदराबाद येथे असल्याचे पोलिसांनी सांगितले तर त्याच्या समर्थकापैकी कुणालाही सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुरकर, तहसीलदार काळबांडे, खंडाळा ठाणेदार बालाजी शेंगेपल्लु परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शेंबाळपिंपरीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.