ठरलं तर….! हे असणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपची घोषणा…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलावरुन जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे.
अशातच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषण केली आहे. गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
गांधीनगर येथे १२ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात शपथविधी होणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
बातमी देईपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुासर, गुजरातमधील 182 जागांपैकी 157 जागांवर भाजप पुढे आहे.
84 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 16 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, आप ५ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला गुजरात निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे.
या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असली तरी मागच्या म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती, त्यामुळे भाजपला 100 जागांवरही विजय मिळवता आला नाही. मागच्या निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या. 2017 साली भाजपला दमवण्यामध्ये तीन चेहऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहिली, पण यावेळी मात्र या तीन पैकी दोन चेहरे भाजपने आपल्याच ताफ्यात घेतले.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांनी भाजपला तगडं आव्हान दिलं होतं, पण यावेळी भाजपने या तीन पैकी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांना पक्षात घेतलं. याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणावर झाला, कारण पाटीदार आणि ओबीसी समाजाची मतं मिळवण्यात भाजपला मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे.