एस.टी.च्या ताफ्यात सात हजार नवीन गाड्या…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या दाखल होणार आहेत.
त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. दरम्यान, सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना मिळणार्या अतिरिक्त उपदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची 302 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले नाशिक महानगरपालिकेला शहर बस वाहतूक सुरू करण्याकरिता निमाणी, भगूर, नाशिकरोड, सातपूर येथे एसटी महामंडळाची आस्थापना सुरू करण्यास आणि मोकळ्या जागा रेडिरेकनरप्रमाणे दर आकारून भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या बैठकीत दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंर्त्यांनी यावेळी मान्यता दिली. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्यासही शिंदे यांनी तत्त्वतः मंजुरी दिली. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकूलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकीट दर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यास मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वीच मान्यता दिली आहे. महामंडळाकडे एकूण 92 हजार अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यांना पूर्वी मिळणारा 28 टक्के महागाई भत्ता आता 34 टक्के दराने मिळणार आहे. यामुळे वेतनखर्चात सुमारे 15 कोटी रुपयांची मासिक वाढ होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकार्यांच्या सन 2016-17 ते 2021-22 या सहा वर्षांसाठीच्या वेतन सुधारणेच्या प्रस्तावासही यावेळी मंजुरी देण्यात आली.
सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना मिळणार्या अतिरिक्त उपदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त उपदान तथा कर्मचारी ठेव निगडित विमा योजनेंतर्गत आर्थिक लाभाची मर्यादा 6 लाख 15 हजारांवरून 7 लाख 5 हजार करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली आहे.
अपघातप्रवण जागांजवळील अतिक्रमणे काढा : शिंदे
राज्यातील एक हजारपेक्षा अधिक अपघातप्रवण जागा असून अपघात टाळण्यासाठी त्या भागात असलेली अतिक्रमणे काढण्याबरोबरच चालकांना स्पष्ट दिसतील असे फलक लावण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. एसटी बसेसची रंगरंगोटी करून स्वच्छता ठेवा, फाटलेली आसने बदला, बस गळती रोखण्यासह फुटलेल्या काचा बदलून नव्याने लावा, असे सांगत एसटीच्या पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
डिझेलवरील पाच हजार गाड्यांचे एलएनजीमध्ये रुपांतर
डिझेलवर धावणार्या पाच हजार बसगाड्यांचे लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. यामुळे डिझेलच्या प्रचलित दरापेक्षा 20 ते 25 टक्के कमी दराने एलएनजीचा पुरवठा होणार आहे. शिवाय संपूर्ण बस वातानुकूलित असल्याने कमी पैशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल. हे काम पुरवठादार कंपनीकडून करण्यात येणार असून सुरुवातीला यात महामंडळाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
एसटी स्टॉल्सना परवाना शुल्कात सवलत
कोरोनाकाळात झालेल्या टाळेबंदीमुळे आणि एसटी कर्मचारी संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. टाळेबंदीच्या मार्च ते ऑगस्ट 2020 या काळासाठी 100 टक्के, एप्रिल ते जून 2021 साठी 50 टक्के आणि नोव्हेंबर 21 ते एप्रिल 2022 या संप कालावधीत परवाना शुल्कात 75 टक्के सवलत देण्याचे मुख्यमंर्त्यांनी जाहीर केले. या सवलतीचा सुमारे 3 हजार 200 परवानाधारक दुकानदारांना लाभ होणार आहे.
या बैठकीला परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
एसटीचे पहिले वाहक केवटे यांना सहप्रवासी सुविधा
एसटी महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्यास तसेच त्यांच्या सोबत प्रवास करणार्या सहप्रवाशास मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. केवटे यांचे वय 98 वर्षे असून विशेष बाब म्हणून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
तिकिटासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा
अँड्रॉईडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे प्रवाशांना एसटी बसची तिकिटे मिळणार आहेत. डेबिट, क्रेडिट कार्ड, गुगल पे आदी ऑनलाईन पेमेंटद्वारे प्रवाशांना आता तिकिटे मिळणार आहेत. त्याशिवाय मोबाईल अॅप-संकेतस्थळाद्वारे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महामंडळाचे आंतरसंवादी नवीन संकेतस्थळ करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन संकेतस्थळ तयार झाल्यानंतर तक्रार निवारण सुविधा, बसेसचे अद्ययावत वेळापत्रक आदी सुविधा देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
पुणे, सांगली जिल्ह्यासाठी 180 बसगाड्या भाडेतत्त्वावर
सीएनजी बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या वाहने एसटीच्या ताफ्यात घेण्यास आणि पुणे, सांगली जिल्ह्यासाठी 180 बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.