नागपुरात १० डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला होणार सुरुवात…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात यापूर्वी २०१९ मध्ये झाले होते. त्यानंतर आता १९ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. १० डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
रवीनगर परिसरातील बंगल्यांच्या रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत.
यावर्षी अधिवेशनावर ९८ कोटींवर खर्च येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अधिवेशनापेक्षा ३० कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. २०१९ मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या तयारीवर एकूण ६८ कोटी रुपये खर्च झाले होते. दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याने सर्वच उत्सुक आहेत. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन अधिवेशन होऊ शकले नाही.
महाविकास आघाडीच्या दुसऱ्या वर्षांच्या काळात कोरोना ओसरला होता. तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तविला जात होती. मुंबईतील झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशन नागपूरला होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विदर्भात मोठी नाराजी व्यक्त होत होती.
शिंदेसेना- भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपूरला होईल, असे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नागपूरला येऊन गेले. त्यांनी पाहणी केली आणि बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामांना सुरुवात केली आहे.