50 खोक्यांच प्रकरण भोवणार ; शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सत्ताबदलानंतर शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर माविआ सरकार सतत ५० खोके सरकार म्हणून डिवचताना दिसत आहे. दरम्यान, आता ५० खोके असा आरोप करणाऱ्यांना हे प्रकरण चांगलच भोवणार आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी विजय शिवतारे यांची नियुक्ती करण्यात आली. या मोठ्या जबाबदारीनंतर शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनाही इशारा दिला आहे.
शिवतारे काय म्हणाले?
काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील. अशा शब्दात शिवतारे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
तसेच, खोके आणि बोके अजित पवारही म्हणत आहेत, सुप्रिया सुळेही म्हणत आहेत आणि आदित्य ठाकरेही म्हणत आहेत, या तिघांनाही नोटीसा पाठवल्या जातील. एकतर तुम्ही दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरं जा. तुम्ही जे ५० खोके घेतल्याचा आरोप करत आहात, त्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करावेत. निश्चतपणे खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल. असेही शिवतारे म्हणाले.