हर हर महादेव चित्रपट वाद..! आपण या विषयावर बोलू नये; राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले.
त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. त्यानंतर आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे.
आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रवक्त्यांना सूचना दिल्या आहे. हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना त्यांनी प्रवक्त्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विवीयाना मॉलमध्ये आंदोलन करण्यात आले. यामुळे सिनेमागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळानंतर अमेय खोपकर यांनी, “अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान.” असे म्हणत आव्हाड यांना खोचक टोला लगावला आहे.