लातूर ग्रामीणनंतर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला दुसरी पसंती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवार ऋजूता लटके यांच्यानंतर नोटा (नन ऑफ दी अबव्ह म्हणजे वरील पैकी कोणीही नाही) या पर्यायाला सुमारे १३ हजार मतदारांनी पसंती दिली आहे.
पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरील नोटाला २७,५०० मतदारांनी पसंती दिली होती. विधानसभा निवडणुकीतील ही सर्वात अधिक नोटाला पसंती मानली जाते.
विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यातील लातूर ग्रामीण या मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. २०१९च्या निवडणुकीत २७,५०० मतदारांनी नोटा बटणाचा वापर केला होता. या मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख विजयी झाले व त्यांना १ लाख ३५ हजार मते मिळाली होती. त्यानंतर नोटाला मतदारांनी पसंती दिली होती. शिवसेनेच्या सचिन देशशमुख यांना १३,५२४ मते मिळाली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विजयी ऋजुता लटके यांच्यानंतर नोटाला १२,८०६ मतदारांनी पसंती दिली.
‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफाॅन्स’ (एडीआर) या संस्थेने नोटाला देशभर मिळालेल्या मतांच्या आधारे केलेल्या अहवालात, गेल्या पाच वर्षांत विविध लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये १ कोटी २९ लाख मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. यापैकी ६४ लाख मतदारांनी विधानसभा निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय वापरला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ५१,६६० नोटाला मतदारांनी पसंती बिहारमधील गोपाळगंज मतदारसंघात दिली होती. विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक २७,५०० मते नोटाला मिळाली होती.