शिंदे गटात परतीचे वारे…? स्वगृही परतण्यास इच्छूक ‘त्या’ आमदाराचं नाव ठाकरे गटाकडून उघड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेत ऐतिहासिक बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीत जावून सरकार स्थापन केलं. शिवाय मुख्यमंत्रीपदही मिळवलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झाल्याची चर्चा होती.
मात्र शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं काही दिवसांपूर्वीच उघड झालं होतं. त्यात आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वात आधी स्वगृही कोण परतणार त्या आमदारांचं नाव उघड केलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, स्वगृही परतणारे पहिले आमदार संजय शिरसाट असतील. शिरसाट अस्वस्थ आहेत. त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांना मंत्रीपदं मिळाली आहेत. त्यामुळे शिरसाट यांच्या आशा मावळल्याच त्यांनी नमूद केलं.
दरम्यान शिंदे गटाकडून कार्यकारणीची पद जाहीर झाली आहे. त्यातही शिरसाट यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे सर्वाधिक पश्चाताप शिरसाट यांना होतोय. त्यामुळे संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान संजय शिरसाट हे औरंगाबादमधील आमदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांच्या परतण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा शिंदे गटाला मोठा धक्का ठरू शकतो.