गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- गोवंश तस्करी रोखणाऱ्या बजरंग दलाच्या एका कट्टर कार्यकर्त्याची गोवंश तस्करांनी अमानुष आणि अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सुकळी (ता. उमरखेड) येथे शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे ( रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. तस्करांनी गजानन यांना गाडीतून ओढून काढत दगडांनी ठेचून मारल्याने संपूर्ण परिसरात संतापाचा ज्वालामुखी फाटला असून, हिंदुत्ववादी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत.
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो पीक-अप वाहनातून (क्र. एम एच २९बीई ८९१५) तब्बल १८ ते २० गोवंशाची अत्यंत निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी उमरखेडच्या दिशेने तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी बिजोरा टोल नाक्यावर सापळा रचून सदर संशयास्पद वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांना हुलकावणी देत तस्करांनी वाहन वेगाने पळवले.
आपल्या डोळ्यांदेखत गोवंशाची तस्करी होत असल्याचे पाहून बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन सुरोशे यांनी तातडीने आपल्या एस-क्रॉस कारने (क्र. एम एच १२पिटी ८६३४) तस्करांच्या वाहनाचा थरारक पाठलाग सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी आपली बोलेरो सुकळी गावाच्या दिशेने वळवली.
गजानन सुरोशे यांचे वाहन मागोमाग सुकळी गावात शिरताच, आधीच दबा धरून बसलेल्या नराधम तस्करांनी आणि त्यांच्या साथीदारांनी गजानन यांच्या गाडीला वेढा घातला. काही समजण्याच्या आतच तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या गाडीवर मोठमोठे दगड आणि लाकडी दांडक्यांनी भीषण हल्ला चढवला.
या हल्ल्याचे अत्यंत हिंस्र आणि अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये तस्कर किती क्रूर बनले होते हे स्पष्ट दिसत आहे. नराधमांनी गाडीची पूर्ण तोडफोड करून गजानन सुरोशे यांना गाडीबाहेर ओढले आणि दगडांनी अमानुषपणे ठेचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गजानन यांना ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेचे गांभीर्य आणि परिसरातील वाढता तणाव पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी तात्काळ मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळ गाठले. सुकळी आणि महागाव परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हत्या करून फरार झालेल्या तस्करांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, “या नराधम दोषींना पाताळातूनही शोधून काढा आणि त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करा, अन्यथा संपूर्ण जिल्हा पेटून उठेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल!”असा थेट आणि आक्रमक इशारा बजरंग दलाने प्रशासनाला दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सदर बोलेरो गाडी सुकळी गावातीलच एका कुप्रसिद्ध तस्कराची असल्याची जोरदार चर्चा असुन या गोवंश तस्करीला राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याचा आरोप केल्या जात आहे.
महागावमध्ये कडकडीत बंद,बाजारपेठ ठप्प
बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन सुरोशे यांच्या या क्रूर हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रविवारी संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या नराधम कृत्याचा निषेध करत ‘महागाव बंद’ची हाक दिली.
आज सकाळपासूनच संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर डाऊन ठेवले. मुख्य बाजारपेठेसह सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून गजानन सुरोशे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तस्करांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गोवंश तस्करीला पोलिसांचे पाठबळ ?
नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचे सर्वश्रुत आहे.ही तस्करी करणारे वाहने अनेक वेळा बजरंग दल व गोरक्षकांनी पकडली परंतु महामार्ग पोलिस, वाहतुक पोलिस, महागाव,उमरखेड पोलिस प्रशासन यांनी स्वतःहून कधीच या जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्याचे ऐकिवात नसल्याने या काळया धंद्यातून मिळणाऱ्या मालिद्यापोटीच पोलिस प्रशासनाकडून कारवाई टाळल्या जात असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा; गडकरींचा मोठा दावा- वाहने आता फक्त २५ रुपये दराच्या इंधनावर चालतील…
गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…